धाराशिव - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उपविभागीय अधिकारी कळंब, जिल्हा धाराशिव यांच्यामार्फत निवेदन सादर करून हा निकाल तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेला अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा व एससी, एसटीला क्रिमीलेअरची अट लागू करण्याचा निकाल घटनाबाह्य असून एससी, एसटीचे आरक्षण संपवण्याचे कटकारस्थान आहे. या निकालाच्या विरोधात आज, 21 ऑगस्ट 2024 रोजी, संपूर्ण दलित, आदिवासी, ओबीसी समाजाच्या सामाजिक, राजकीय संघटनांनी भारत बंद पुकारला आहे.
या भारत बंदला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) व लोकजन शक्ती पार्टी, जिल्हा शाखा धाराशिव यांनी पाठिंबा दर्शवला आहे. निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करून अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणामध्ये छेडछाड करण्यात येऊ नये यासाठी संसदेत कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, लोकजन शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड,नागेश धीरे, सुरेश कांबळे,भारत कदम, जावेद शेख,अरुण कांबळे,बालाजी वाघमारे, निवृत्ती हौसलमल,बाबासाहेब ओव्हाळ,आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत
COMMENTS