कळंब - एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी एका कर्मचाऱ्याने बीएसएनलच्या मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. १२४ कर्मचारी गेले, तुम्हाला काही फरक पडला नाही, तुम्ही त्यांचे बलिदान विसरला असाल परंतु मी या गोष्टी विसरलो नाही,’, असे म्हणत एसटी वाहक सच्चिदानंद पुरी यांनी कळंब शहरातील बीएसएनलच्या मोबाइल टॉवरवर चढून आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन सुरू केले,
कळंबमध्ये भारत संचार निगम लिमिटेडच्या आवारात २६० फूट उंचीचा भ्रमणध्वनी मनोरा आहे. एसटीचे वाहक सच्चिदानंद पुरी यांनी पहाटे त्या टॉवरवर २१० फुटापर्यंत चढाई करत आंदोलन सुरू केले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ते मागण्यांवर ठाम असून खाली उतरले नव्हते. सच्चिदानंद पुरी हे कळंब आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. मागील वर्षी विलिनीकरणाच्या मुद्यावरून झालेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता.
नायब तहसीलदार राजेश तापडिया, आगारप्रमुख मिथुन राठोड, मंडळ अधिकारी टी. डी. मटके, तलाठी व्यंकटेश लोमटे, सहायक पोलिस निरीक्षक राम चाटे यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला होता. मात्र आंदोलक मागण्यांवर ठाम होता. पोलिस कर्मचारी श्रीराम मायंदे, विनोद चेडे व अन्य पोलिस कर्मचारी ठाण मांडून होते. मात्र दिवसभर तोडगा निघाला नव्हता.
सच्चिदानंद पुरी यांनी विलिनीकरणाच्या मुद्यावर आंदोलन सुरू असताना १ नोव्हेंबर २०२२ रोजी झाडावर चढून गळ्यात फास अडकवून आंदोलन केले होते. संपात सहभागी असल्यामुळे पुरी यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर शिंदे सरकारने बडतर्फिचा निर्णय मागे घेतला होता. तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा दिनांक १ मार्च २०२३ रोजी पुरी यांनी गळ्यात फास अडकवून टॉवरवर चढत आंदोलन केले होते. त्यानंतर दिनांक २७ जून २०२४ रोजी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आत्मक्लेश आमरण उपोषण केले.
COMMENTS