उस्मानाबाद -राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागामध्ये शेतकऱ्याकडुन विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकयांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकुण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पिक स्पर्धा योजना या रब्बी हंगामात राबविण्यात येणार आहे.या योजनेत रब्बी हंगामातील ज्वारी,गहू,हरभरा,करडई जवस,तीळ या सहा पिकाचा समावेश केला आहे. पिकस्पर्धेत भाग घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिंसेबर आहे.
पिक स्पर्धेतील पिकाची निवड करताना पिक निहाय तालुक्यातील संबधित पिकाखालील क्षेत्र किमान १००० हेक्टर असावे.हरभरा,गहू व रब्बी ज्वारी पिकाकरिता सर्व तालुक्यात स्पर्धा आयोजित करण्यात येतील. तसेच उमरगा व लोहारा तालुक्यात करडई पिकासाठी स्पर्धकाचे अर्ज स्विकारले जातील. पिक स्पर्धेसाठी खालील अटी व शर्ती लागू राहतील.पिक स्पर्धेसाठी पिक निहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल.किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी १० व अदिवासी गटासाठी ०५.
पिकस्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्यापिकाखालील किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड करणे आवश्यक असणे आवश्यक आहे.तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या - सर्वसाधारण गटासाठी ०५ व अदिवासी गटासाठी ०४.सर्वसाधारण व अदिवासी गटासाठी पिक निहाय प्रत्येकी रक्कम रु.३०० प्रवेश शुल्क राहील.स्पर्धेत कोणताही शेतकरी भाग घेऊ शकतो.सदर पिक स्पर्धा तालुका , जिल्हा,विभाग व राज्यस्तरावर पिक स्पर्धा होईल.पिक कापणी समिती मार्फत पीक उत्पादनाची आकडेवारी घेण्यात येईल.तालुका स्तरावर प्रथम रु.५०००/-,द्वित्तीय रु.३०००/-तृतीय रु.२०००/-असे तीन क्रमांक राहतील. जिल्हा स्तरावर प्रथम रु.१०,०००/-,द्वित्तीय रु.७०००/-तृतीय रु.५०००/-असे तीन क्रमांक राहतील.राज्यस्तरावर प्रथम रु.५०,०००/-,द्वित्तीय रु.४०,०००/- तृतीय रु.३०,०००/-असे तीन क्रमांक राहतील.
अधिक माहितीसाठी,तालुका कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी,कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. पिक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकाना विहीत नमुन्यात अर्ज (प्रपत्र -अ),ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन व ७/१२, ८ अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ अदिवासी असल्यास) तरी जिल्हयातील जास्तीत जासत शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत भाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.उमेश घाटगे यांनी केले आहे.
COMMENTS