तुळजापूर - रायगड जिल्ह्यातील कारचालकास बंदुकीचा धाक दाखवून त्यांना एका झाडाला बांधून त्यांच्याजवळील दोन मोबाइल, रोख रक्कम व कार अज्ञात पाच दरोडेखोरांनी चोरून नेली. ही घटना दि.२९ रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास औसा ते तुळजापूर मार्गावर घडली.
रमाकांत लक्ष्मण सोनकांबळे (रा. वाकडी, जि. रायगड) हे मंगळवारी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या हुंदाई आय- २० स्पोर्ट कार क्र. एमएच ०४ एफएफ ५९१ ही चालवत जात होते. टोलनाक्यापासून वीस किलोमीटरवर आले असता, पाच दरोडेखोरांनी त्यांना कार बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखविण्यात आला. ‘‘आवाज करू नको, नाहीतर गोळी घालेन, तुझ्याजवळचे सर्व पैसे आमच्याकडे दे,’’ असे धमकावले.
यावेळी लुटारूंनी त्यांच्याजवळील दोन मोबाइल व आठ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांना त्यांच्याच गाडीत बसवून आणल्यानंतर नळदूर्ग रोडवरील चिंचेच्या झाडाला बांधले. त्यानंतर हुंदाई कार घेऊन दरोडेखोर पसार झाले.
या प्रकरणी सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
COMMENTS