जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या उपचारावर प्रश्नचिन्ह
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या प्रचंड वाढली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढत चालला आहे.दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्याची उपचाराची जबाबदारी असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांनाच कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उस्मानाबाद शहरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या उपचारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्येने साडेदहा हजारांचा टप्पा पार केला आहे. सातत्याने दररोज काही अपवाद वगळता २०० च्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. यामुळे सर्व मोठ्याप्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशात संपूर्ण जिल्ह्यातील उपचाराची जबाबदारी असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनाही कोरोनाने घेरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मात्र, त्यांच्यावर उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात अनेक आरोग्य व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाने घेरलेले आहे. यातील बहुतांश सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खासगी रुग्णालयातच उपचार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील अगदी बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालय किंवा अन्य कोणत्याही सरकारी रुग्णालयातच उपचार घेतले आहेत. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील काही डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली होती. यापैकी बहुतांश डॉक्टरांनी जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात उपचार घेणे टाळले. काहींनी थेट पुणे व हैदराबाद गाठून उपचार घेतले आहेत.
गलांडे गेले, पाटील आले, कोरोनाचे चांगभले !
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर मागील महिन्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आणि पदभार डॉ. धनंजय पाटील यांच्याकडे देण्यात आला , मात्र पाटील यांच्या काळात नियंत्रण सुटले आहे. डॉ. पाटील हे एका राजकीय पुढाऱ्याचे नातेवाईक आहेत, डॉ. पाटील यांना आता मोठे कुरण भेटले असले तरी रुग्णाच्या सेवेकडे दुर्लक्ष होत आहे.
रेमडेसिवीरचा तुटवडा
जिल्ह्यात विविध ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा सुरूच आहे. यामुळे रुग्णांची मोठी दमछाक होत आहे. अगोदरच्या टप्प्यातही रेमडेसिवीर इंजक्शनचा तुटवडा भासला होता. त्यानंतर पुन्हा गेल्या पाच ते सात दिवसांपासून तुटवडा भासत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे इंजक्शन अत्यंत उपयोगी आहे. यामुळे याची गरज सातत्याने भासते. याची उपलब्धता मुबलक प्रमाणात ठेवण्याची गरज असताना याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. रुग्णांचे नातेवाईक याचा शोध घेत शहरात फिरताना दिसत आहेत.
सर्व मेडिकल्सला रेमिडीसिवर इंजेक्शनचा पुरवठा करावा
उस्मानाबादेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवर सध्यातरी रेमिडीसिवर इंजेक्शनचा रामबाण उपाय आहे. याचाही सध्या मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातलगांची दमछाक होते आहे. माझे 32 वर्षापांसून बस बसस्थानकासमोर मध्यवर्ती भागात औषध दुकान आहे. माझ्या कडे दररोज सरासरी चार ते पाच जण रेमिडीसिवर इंजेक्शन विचारण्यासाठी येतात. पण आम्हाला ठोक विक्रेते पुरवठा करत नाहीत. रेमिडीसिवर इंजेक्शन विकण्यासाठी निदान महत्वाच्या औषध विक्रेत्यांना परवानगी मिळाल्यास उपलब्धता वाढून सर्वांचाच त्रास कमी होईल.
- मुकेश नायगांवकर,नायगांवकर मेडिकल ,उस्मानाबाद
काय रे धनंजय तुझा सरकारी हॉस्पिटलवर भरोसा नाय का ?
उत्तर द्याहटवा